ज्युनियर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना प्रभावी कामगिरी करुन वैष्णवी पाटील हिने सुवर्णपदके मिळवुन उंचावले करमाळयाचे नाव
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील वैष्णवी पाटील हिने ४२ व्या एन. टी. पी. सी. ज्युनियर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना प्रभावी कामगिरी नोंदविली आहे. तिने वैयक्तिक तीन रौप्य आणि सांघिक कामगिरीत एक सुवर्ण अशी एकूण चार पदके मिळवून करमाळ्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे.पणजी ( गोवा ) येथे नऊ ते अकरा नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये पाटील हिने इंडियन बो स्पर्धा प्रकारात एकवीस वर्षेखालील वयोगटात खेळताना तिने चार पदके पटकावून यश मिळविले. तिने तीन रौप्य पदके वैयक्तिक प्रकारात मिळविली. तर सांघिक प्रकारात समृद्धी पवार (अरण, ता. माढा ) व साक्षी फाटे (नाशिक) यांच्यासह सुवर्ण पदक पटकविणारी कामगिरी केली.
तिरोडा (गोंदिया) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशानंतर गोवा राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. तिला मोडनिंब येथील एकलव्य ऍकॅडमीचे विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या यशानंतर बोलताना पाटील हिने या यशाने आनंद झाला आहे. आता अरण येथे होणाऱ्या शालेय स्पर्धेत सतरा वर्षेखालील वयोगटात सहभागी होवून सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. तिच्या या यशांनंतर विविध स्तरातून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर केली मातकरमाळ्यात आर्चरीचे प्रशिक्षण मिळत नाही. त्यावर पर्याय म्हणून वैष्णवी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे विठ्ठल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असताना स्पर्धेला जाण्याच्या अगोदर बाण मारायच्या बोटाला जखम झाली होती. मात्र तिने जिद्दीने सराव सुरु ठेवला. गोवा स्पर्धेत सहभाग नोंदवीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने चार पदके मिळवणारे यश प्राप्त केले. अशी माहिती तिचे वडील कुमार पाटील यांनी दिली.
