योग दिंडीतून करमाळ्यात आरोग्य, राष्ट्रभक्ती आणि सकारात्मकतेचा जागर; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करमाळा येथील ध्यान योग साधना केंद्र, भारत स्वाभिमान न्यास आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. योगाचा प्रसार-प्रचार व्हावा, देशाचा अभिमान व स्वाभिमान वृद्धिंगत व्हावा, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि समाजामध्ये योगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या योग दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ध्यान योग साधना केंद्राचे संचालक बाळासाहेब नरारे यांनी दिली. दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या दिंडीमध्ये सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले. तसेच योगाविषयी संदेश देणारे फलक आणि आकर्षक बॅनर्स विविध विद्यार्थी, महिला व पुरुषांच्या हातात झळकत होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिंडीदरम्यान “करे योग, रहे निरोग”, “योग हीच आरोग्याची गुरुकिल्ली” अशा घोषणा देत योगाचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आले. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त होते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. योग दिंडीमुळे शहरात आरोग्य, सकारात्मकता आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. दिंडीची सांगता ही वीस मिनिटांचे ध्यान घेऊन करण्यात आली..


