करमाळ्यात १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे गुरुजी व पं. वि. दिं. पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता यश कल्याणी सेवाभावी भवन, पुणे रोड, करमाळा येथे संपन्न होणार आहे.संगीत, नृत्य आणि भारतीय कला-संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे. विविध राज्यांमधून तसेच देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या कलाकारांच्या सहभागामुळे या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. शास्त्रीय गायन, विविध नृत्यप्रकार, वाद्यसंगीत तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय
काम करणाऱ्यां चा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
या वर्षीच्या पुरस्कारासाठी डॉ. श्रद्धा जवंजाळ, डॉ. सुनीता टिकारे, अवंतिका सिन्हा, ज्योती दास, देबाश्री मुखर्जी, बिजिता गोस्वामी, तनमना चौधरी, मृदुस्मिता दत्ता, स्निग्धा टाईड आणि भाग्यश्री पेंधे या मान्यवर कलाकारांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा ‘सुरताल’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे वितरण मा. सौ. सोनियाताई जयकुमार गोरे (संचालिका – सिद्धनाथ पतसंस्था) यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सौ. रश्मी दीदी बागल कोलते, मा. सौ. मोहिनीताई सावंत, मा. सौ. डॉ. प्रचिती पुंडे, मा. श्री. विलासरावजी घुमरे, मा. श्री. गणेश करे पाटील, मा. श्री. कन्हैयालाल देवी, मा. श्री. श्रेणिक सेठ खाटेर, मा. श्री. भारतभाऊ शिंदे पाटील आणि संतोष शेठ शियाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
करमाळ्यात संगीत व नृत्य कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचा प्रसार करणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. संगीत रसिक, कलाप्रेमी, नागरिक आणि कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नरारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


