Friday, August 21, 2026
Latest:
Uncategorized

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी
करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार असताना बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे बंद करण्यात आलेली बससेवा येत्या आठ दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अन्यथा सुमारे २०० विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन एसटी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबर राजेभोसले यांनी दिला आहे.
करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील बस नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. करमाळा–कुर्डूवाडी–घोटी मार्गावरील बसची वेळ एकच असल्याचे कारण सांगून नेरले मार्गे सुरू असलेली बस अचानक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, विद्यार्थ्यांचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावर या बससेवा बंदीचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
नेरले येथून रोपळे येथे शिक्षणासाठी दररोज सुमारे २५ ते ३० मुली प्रवास करतात. शासनाकडून मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असतानाही बससेवा बंद झाल्यामुळे या विद्यार्थिनींना खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीच्या कुटुंबाला सुमारे १२ हजार ५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबांसाठी हा खर्च मोठा असल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
बससेवेअभावी नेरले येथील नागरिक व विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी जावे-यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नियमित बससेवा नसल्याने शिक्षण, रोजगार, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
नेरले गावाला नियमित एसटी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासावरही परिणाम होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. बससेवेअभावी तरुण-तरुणींना शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी बाहेर पडताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे ही केवळ प्रवाशांची मागणी नसून ग्रामीण भागाच्या विकासाची गरज असल्याचे राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नाकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर एसटी महामंडळ कार्यालय, करमाळा आगारप्रमुख, करमाळा पोलिस निरीक्षक आणि तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही १८ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आल्याची माहिती औदुंबर राजेभोसले यांनी दिली.
बससेवा आठ दिवसांत सुरू न झाल्यास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन एसटी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी एसटी महामंडळाची राहील, असेही राजेभोसले यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. नेरले गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने तातडीने निर्णय घेऊन करमाळा–कुर्डूवाडी–नेरले बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!