कै.कमल साळुंके यांच्या स्मरणार्थ काव्यमैफीलेचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी सातोली ता करमाळा येथील आरोग्यधाम येथे कै. सौ कमल बबनराव साळुंके यांच्या स्मरणार्थ काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे होते.
यावेळी कवी हरिश्चंद्र पाटील, प्रा.संतोष साळुंके, डॉ.अंकुश तळेकर, प्रा.सौ.प्रिती कुरडे, सोमनाथ टकले, प्रज्ञा दिक्षित यांनी सक्रीय सहभाग घेवून सर्वांची मने जिंकली. आई बद्दलच्या कविता सादर करून सर्वच श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी तरळले तर वास्तववादी कविता ऐकून श्रोते भानावर आल्याचे दिसले.सर्व सहभागी कवीना एक पुस्तक, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
हरिश्चंद्र पाटील यांनी आई विषयी आपली कविता सादर केली ठेविले तुला मी आई काळजातल्या ठाईं, तरी निघून जाण्याची केलीस का गं घाई?
गेले सुकून अंगणी तुझे गुलाब जाई जुई,
येशील का गं परतुनी पुन्हा एकदा आई…..!! .
या शब्दांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.
प्रज्ञा दिक्षित यांनी। ओला सुवास मातीचा अन थेंब पावसाचा..!
मन वेडे अजूनही अन रिता कोपरा ह्रदयाचा…!! ही मनाला भिडणारी कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.
प्रीती कुर्डे यांनी आपली ‘संघर्ष’ ही कविता सादर केलीमुलगी म्हणून जन्माला आली हाच मोठा संघर्ष.!अस्तित्व टीकवण्यापासून साकारण्यापर्यंत तिचा संघर्ष ..!! या कवितेतून त्यांनी मुलीच्या जन्मापासून चा संघर्ष मांडला. उपस्थित सर्वांना विचार करायला भाग पाडले.सर्व कवींनी आपली रचना सादर करून उपस्थित सर्वांची मने जिंकली.वास्तव जीवनाचे चित्र उलगडण्याचा प्रयत्न केला.या कार्यक्रमाचे वेळी चार्टर्ड अकाऊंटट केशवराव साळुंके, द्राक्ष बागायतदार चंद्रसेन गवळी, लोकसेवक बबनराव साळुंके, रमेश गवळी, भरत कामटे,भास्करराव साळुंके, दत्तात्र्यय साळुंके, सचिन पाटील नरखेडकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक हरिश्चंद्र साळुंके यांनी सर्वांचे आभार मानले.
