करमाळा तालुक्यात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत आमदार शिंदे यांनी घेतली अधिकारी व ठेकेदार यांची बैठक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सुरु असलेल्या रस्त्यांच्या विविध कामांसंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १७) शासकीय विश्रामगृह येथे अधिकारी व संबंधित कामाचे ठेकेदार यांची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार शिंदे यांनी रस्त्याच्या निर्मिती संदर्भात असलेल्या समस्या जाणून घेऊन रस्त्याची कामे वेळेत व दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कोर्टी परिसरामध्ये असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात वनविभागाची अडचण आहे ,ती अडचण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येईल तसेच निधी संदर्भात काही अडचण आल्यास आपणास सांगावे, आपण त्यासाठी पाठपुरावा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
करमाळा तालुक्यात कोर्टी ते आवाटी रोड, बाभूळगाव- जिंती- पारेवाडी, पोपळज, ते कुंभेज रोड तसेच सालसे- करमाळा रोडच्या दुरुस्तीबाबत अधिकारी व संबंधित कामाचे ठेकेदार यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तेलंग, उपअभियंता नाईकवाडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उबाळे, ज्युनिअर इंजिनिअर नाझरे यांच्यासह उध्दव माळी व कर्मचारी उपस्थित होते.
