आमदारांमुळे शिवसेना नाही तर शिवसैनिकांमुळे आमदार फुटीतावादी आमदारांना शिवसैनिक धडा शिकवणार – प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख करमाळा
करमाळा प्रतिनिधी:- करमाळा तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी संपूर्ण ताकदीनिशी उद्धव साहेबांसोबत आहे. शिवसेनेला संघर्ष नवा नसून पुन्हा नव्या दमाने व नव्या उमदीने पक्ष मजबूत करू त्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत असे प्रतिपादन करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी गायकवाड बोलताना म्हणाल्या की, सत्ता असो नसो शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. परंतु ज्यांनी आज पर्यंत शिवसेनेला खिंडीत पकडण्याचे काम केले आहे त्यांच्या राजकीय जीवनाची माती तर झालीच आहे पण त्यांचे सामाजिक जीवन ही कलांकित झाले आहे. हया शिवसेनेने आजपर्यंत सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिकाला एवढ्या मोठ्या मोठ्या पदांवर नेऊन बसवले आहे की, जे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ही शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत. जो माणूस इतक्या वेळा विधानसभेला पडला एकेकाळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून उभा राहुन ही पडला तो आज शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक येऊन शिवसेनेशीच गद्दारी करत आहे. असा विश्वासघातकी पाटील पुन्हा कसे आणि कोणत्या पक्षातून निवडून येतात याची संपूर्ण खबरदारी शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेनेची पाळ, मुळ ही खोलवर रुजली असुन आमदारांमुळे शिवसेना नाही तर शिवसैनिकांमुळे आमदार आहेत हे फुटीरवादी आमदारांनी लक्षात घ्यावे. आज पर्यंत या आमदारांना शिवसैनिकांनी डोक्यावर घेऊन नाचले आहे पण गद्दारी केल्यास पायाखाली तुडवायला ही मागे पुढे पाहणार नाही. आमदार गेले तरी शिवसैनिक हा खंबीरपणे उद्धवसाहेबांसोबत उभा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात बंडखोर आमदारां विरोधात उभारलेला नागरिक हा कोणी लालच दाखवून आणलेला नसून फक्त बाळासाहेब, उद्धवसाहेब, शिवसेना आणि मातोश्री या नावाने जोडला गेलेला शिवसैनिक आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा नवी उभारी आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदानंतर पंतप्रधान पदी नियुक्ती झालेले सर्व शिवसैनिकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करू असा आत्मविश्वास यावेळी गायकवाड यांनी व्यक्त केला.
