विद्यार्थ्याची गैरसोय दुर करण्यासाठी घारगाव शेळगाव एसटी सुरु करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील घारगाव, बोरगावसह शेळगाव या भागातून करमाळ्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी घारगाव मार्गे करमाळा- शेळगाव एसटी बस सुरू करावी, अशी मागणी करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील व घारगावचे मा.सरपंच किरण पाटील यांनी आगार प्रमुख अश्विनी किरगत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सध्या सर्व शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची एसटी बस नियमित सुरू करण्याची आवश्यकता आहे. करमाळा- घारगाव- शेळगाव या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्याप्रमाणात बसच्या फेऱ्या नाहीत. आहेत त्या बसही वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
