सोलापुर जिल्हयाचे वरदायिनी उजनी धरण शंभरी पार शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण
करमाळा प्रतिनिधी सोलापुर पुणे पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदायनी ठरलेले उजनी धरण शुक्रवार दि १२.ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ घ्या सुमारास १०० टक्के भरले, सध्या धरणात ११७ टीएमसी पाणी साठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील दिड महिन्यांपासून अनेक वेळा दौंड मधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आला होता, परंतु पुण्यासह मावळमध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे व दौंड येथून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावरच उजनी धरणाने आज १०० टक्क्याची पातळी गाठली आहे.
२०१९ या वर्षी उजनी २७ ऑगस्टला १०० टक्के भरले होते. तर २०२० वर्षी उजनी ६ ऑगस्ट रोजी १०० टक्के झाले होते.तर ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी उजनी शंभर टक्के भरले होते. मात्र या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा जवळपास दोन महिने अगोदर उजनी धरण १०० टक्के भरले आहे. उजनीची निर्मिती झाल्यापासून म्हणजे गेल्या ४३ वर्षात ३३ वेळा १०० टक्के उजनी धरण भरले गेले आहे.
उजनी धरणावरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी अनेक धरणे १०० टक्के भरून ‘ओव्हरफ्लो’ झालेली आहेत.जुलै महिन्या पासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व नद्यांन मध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती.हे वाढ झालेले पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत राहिल्यामुळे आज अखेरीस उजनी धरण १०० टक्के भरू शकले आहे.पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर उजनी धरण १०० टक्के भरले असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
