आदिनाथ साखर कारखाना सुरु करण्यासाठी ना.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार नारायण पाटील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल एकत्र काम करणार
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांची माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी भेट घेतली आहे. पुणे येथे ही भेट झाली आहे. या भेटीमध्ये आदिनाथ कारखाना सुरु करणे या विषयावर चर्चा झाली आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. सध्या याचे न्यायालयात प्रकरण आहे. दुसरीकडे आदिनाथ सुरु करण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. काल (शनिवारी) माजी आमदार पाटील यांनी कारखान्याची पहाणी केली होती. बागल गटानेही काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाची बैठक घेतली होती. कारखाना सुरु करण्यासाठी मंत्री सावंत हे मदत करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रणजितसिंह मोहिते पाटील व प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कारखाना सुरु करत असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना बागल व पाटील आदिनाथसाठी एकत्र काम करणार असल्याचे सांगितले होते.आदिनाथ कारखाना सुरु होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कारवाई करत कारखान्याचा लिलाव केला होता. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोकडे हा कारखाना गेला होता. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यावर निकाल आलेला नाही मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करून काम सुरु केले असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे हे कारखाना सुरु करण्यासाठी नियोजन करत आहेत.आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली तेव्हा पाटील गटाचे नवनाथ झोळ व देवानंद बागल उपस्थित होते. आदिनाथ सुरु करण्याबाबतच या भेटीवेळी चर्चा झाली आहे. आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तीन वर्षात हा कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत गेला. हा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा म्हणून प्रयत्न सुरु झाले. यात यश आले. त्यात आरोग्यमंत्री सावंत यांनी मदत केली. सध्या कारखाना बागल गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्री सावंत यांनी बागल व पाटील यांची बैठक घेतली. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ कारखान्याचे गाळप झाले पाहिजे, यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आरोग्य मंत्री सावंत यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
