Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेच्या भिडे वाडयास नवजीवन मिळावे यासाठी शेकडो महिलांचा मूकमोर्चा

 

लावूनी दिप अक्षरांचे ,
उजळवल्या प्रतिभेच्या वाती ,,
शारदेची छाया मोठी ,
भारावल्या दिपस्तंभाच्या ज्योती.
अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई, फातिमामाई, आणि म . जोतिबांस विनम्र अभिवादन करून भिडेवाड्यास नवजीवन मिळावे त्याचे जतन व्हावे यासाठी आज दि. १८ सप्टेंबर रोजी शेकडो महिला शिक्षिका आणि गृहिणी यांनी सावित्रीबाई आणि फातिमामाई यांच्या वेशभूषेत लाल महाल ते भिडेवाडा असा मूकमोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
ज्या भिडेवाड्यात १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा उघडून साऊफातिमांनी मळलेल्या वाटा विसरून आडवाट जोमाने तुडवली , स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार जाळून त्यांना साक्षर बनवून प्रत्येक वादळ लिलया पेलण्यास सक्षम बनवलं, त्यांची शैक्षणिक आबाळ थांबवण्यासाठी प्रवाहाविरोधात पोहून त्यांना उंबरठ्याबाहेरचं जग दाखवलं ,ज्या साऊफातिमाच्या बळावरच आज समस्त स्त्रीवर्ग अशी उंच उंच झेप घेतोय की त्यांना अक्षरक्षः आकाश देखील अपुरे पडतेय, त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश सर्वदूर पसरतोय…म्हणजेच ज्या इमारतीत साऊफातिमानी मिळून स्त्री शिक्षणाचा पाया रचला , त्या इमारतीचाच पाया आज खचलाय… ही इमारत मोडकळीस आली असून अतिशय दयनीय अवस्थेत आहे , ही शोकांतिका..
ज्या इमारतीत स्त्रीमुक्तीची खरी पहाट झाली त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व ती जतन केली जावी ही शासनाकडून अपेक्षा आहे आणि ती समस्त साऊफातिमाच्या लेकींना ओवाळणी असेल अशा प्रतिक्रिया उपस्थित साऊफातिमाच्या लेकींच्या होत्या.
स्त्रियांचे जीवनमान उंचावणाऱ्या या महान समाजसुधारकांच्या कार्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. महिलांसाठी साऊफातिमांनी केलेले कार्य अतुलनीय व इतिहासाला कधीही न पुसता येणारे आहे, त्यामुळेच शासनाने याची त्वरित दखल घेऊन या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक बनवून त्याचा वारसा जतन करावा ही कळकळीची विनंती ही या लेकींनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महिला या मोर्चात सामिल झाल्या होत्या त्यामुळे या मूकमोर्चाने आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
करमाळा तालुक्यातून या मोर्चासाठी क्रांतीज्योती ग्रुपच्या तालुका प्रतिनिधी श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख), सौ. वंदना पांडव आणि सदस्य सौ.संध्याराणी भिसे, सौ.अलका राऊत ,
सौ .मनिषा उघडे , श्रीम. शाबिरा मिर्झा, सौ. गंगुबाई चव्हाण,सौ. प्रतिष्ठा चिंदे , सौ. सुवर्णा जाधव, श्रीम. प्रफुल्लता सातपुते, श्रीम. लक्ष्मी काटकर, सौ. सुजाता अनारसे, श्रीम. शिल्पा कुलकर्णी ,सौ. अनिता राऊत, सौ. मैना भोसले, सौ. साधना करपे ,सौ. विजयालक्ष्मी गोरे, सौ. अनघा शिंदे , सौ. रुपाली लोटके या महिलांनी सहभाग घेतला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group