लम्पीच्या सावटाखाली बैलपोळा घरच्या घरी साजरा
केत्तूर (अभय माने) लम्पी स्किनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील तसेच उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी बैलपोळा सण आज रोजी रविवार (ता.25 ) रोजी साध्या पद्धतीनेच साजरा केला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष बैलपोळा सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता.यावर्षी लम्पीच्या संकटामुळे तो साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यातून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
करमाळा तालुक्याशेजारील नगर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. खबरदारी म्हणून करमाळा पशुसंवर्धन खात्याने तालुक्यातील बैलपोळा घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना व पशुपालकांना केले होते. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील पशुपालकांनी घरच्या घरीच गोठ्यातच गुरांढोराना रंगरंगोटी,आकर्षक सजावट केली व त्यानंतर सगळ्यांची पूजाअर्चा करून बैलपोळा सण साजरा केला.
