केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असुन शेतकऱ्यांनी एकी दाखवुन कंपन्याना धडा शिकवणे गरजेचे- चंद्रकांत काका सरडे
करमाळा प्रतिंनिधी करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता वाढली असून शेतकऱ्यांनी याला बळी न पडता सगळ्यांनी एकी दाखवण्याची गरज असुन या कंपन्यांचा शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे यांनी केले आहे.यावेळी बोलताना सरडे म्हणाले की, निर्यातक्षम केळीच्या दरात कसलीही घसरण झाली नाही. केळीसह खोडवा केळीच्या मागणीत मागील दोन दिवसात वाढ झाली आहे. निर्यातदार कंपन्या कडून २७ रुपये ते २८ रुपये दराने खरेदी चालू आहे. परंतु एजंट, व्यापारी यांच्या कडून जाणुनबुजून दर पाडण्याचा घाट घातला जात आहे.
बंदरात शिप नाही, शिप लागण्याची तारीख पुढे ढकलली आहे, शिप ऊपलब्ध नाही असे कारण दिले जात आहे. जर कमी दरात शेतकर्यांनी माल दिला तर ही कारणे न देता लगेच खरेदी केली जात आहे. त्यामुळे सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकीच बळ दाखवत व्यापाऱ्यांचा दर पाडण्याचा डाव हाणून पाडावा. सर्व शेतकर्यांनी कमी दरात मालाची विक्री करु नये असे आवाहन केले आहे.
येणाऱ्या काळात हाच दर पंधरा रुपयापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची अडचण पाहता या कंपन्या शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रयत्न करणार आहेत. यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता शेतकऱ्यांनी एकी दाखवत यांचा डाव हाणून पाडला तरच शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो. या सर्व प्रकरणात सरकारनेही लक्ष घालण्याची आवाहन यावेळी सरडे यांनी केले आहे.
