स्पर्धा परीक्षेचे शुल्क कमी करा आमदार संजयमामा शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे राज्य लोकसेवा आयोग, पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अनेक विभागांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा सध्या घेतल्या जात असून सदर परीक्षांचे शुल्क भरमसाठ वाढवलेले आहे. सदर शुल्क कमी करून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे.
सदर पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की सध्या महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य लोकसेवा आयोग, पशुसंवर्धन विभाग ,वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क इत्यादी अनेक विभागांच्या वतीने मोठ्या अवधीनंतर विविध विभागातील रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट राज्य शासनाच्या वतीने खाजगी कंपन्यांना दिलेले आहे. या कंपन्यांकडून सरसकट खुल्या प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर इतर मागासवर्ग व अनाथ उमेदवारांसाठी सरसकट 900/- रुपये शुल्क आकारले जात आहे.
एकीकडे वर्षानुवर्ष जागा भरल्या जात नाहीत. ग्रामीण भागातील तरुण शहरांच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातो .त्याचा राहण्याचा, शिक्षणाचा खर्च तसेच एकाच वेळेस 3 – 4 वेगवेगळ्या विभागांसाठी निघालेल्या परीक्षांचे अर्ज भरताना त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, प्रवास खर्च यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण कमालीचे अडचणीत आलेले आहेत .त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या भरती प्रक्रियेचे वाढवलेले परीक्षा शुल्क कमी करून ग्रामीण भागातील तरुणांना उचित न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
