सोगाव येथील कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा आधार; घेतले शैक्षणिक पालकत्व
करमाळा प्रतिनिधी पुणे येथील जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी करमाळा तालुक्यातील सोगाव(प) या गावातील नऊ बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप केले व त्यांना शैक्षणिक दत्तक घेतले आहे.या शैक्षणिक साहित्याचे वाटप सोगाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले. यावेळी सरपंच पुष्पलात गोडगे, सरपंच प्रतिनिधी स्वप्नील गोडगे, जगदिशब्द फाउंडेशनचे संस्थापक व व्याख्याते जगदीश ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य भगवान निवृत्ती बरडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोडगे, चंद्रकांत गोसावी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, मनोज घनवट, तुळशीदास सरडे, जितेश कदम, तुळशीदास गोडगे, जुनी पेन्शन संघटनेचे सोलापूर जिल्हा संस्थापक अध्यक्ष नवनाथ धांडोरे, वांगीचे उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे आदी जण यावेळी उपस्थित होते.
ज्या विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचा कोरोना काळात मृत्यू झाला, अशी बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत, शालाबाह्य होऊ नयेत. त्यांना अशा वाईट काळात आर्थिक हातभार द्यावा व मानसिक बळ द्यावे या उदात्त हेतूने जगदिशब्द फाउंडेशन ने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
आज सोगाव(प) येथील शैला(६ वी) , भक्ती(५ वी), गौरी(३ री), योगिता(१ ली), अंजली(१० वैशाली(८ वी), सोमनाथ(४ थी), कृष्णा(२ री), ज्ञानेश्वर(अंगणवाडी) फाउंडेशन च्या वतीने यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. पुढील काळात ही या विद्यार्थ्यांना फाउंडेशन कडून वेळोवेळी शैक्षणिक मदत केली जाईल असे जगदीश ओहोळ यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक असणारे गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील सोगाव हे गाव आहे. म्हणून या गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, आई, वडील हरवलेल्या पाल्यांना ऊर्जा मिळावी, ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत या हेतूनेही आम्ही सोगाव येथील या पाल्यांना आम्ही आधार देत आहोत.
चौकट –
व्याख्यानांसाठी राज्यभर फिरत असताना मनात विचार येतो की, महामानवांचे व इतर आपण जे विचार जगासमोर मांडतो त्या सर्व विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे आणि ती प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्ही ‘जगदिशब्द फाउंडेशन’ ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून शिक्षण हे आमच्या कार्याचे मुख्य क्षेत्र असणार आहे. गावगाड्यातील गरजू, कष्टकरी, उपेक्षित, वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवित आहोत. भविष्यात हे कार्य राज्यभर करू!
– जगदीश ओहोळ
(व्याख्याते व संस्थापक जगदीशब्द फाउंडेशन)
