सिना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यासाठी सुरू…
करमाळा प्रतिनिधी
अनेक अडचणीवरती मात करून, 2017 पासून बंद असलेल्या सिना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यातील नेरले व गौंडरे येथील तलावाला मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सिना कोळेगाव प्रकल्प प्रत्येक वर्षी शंभर टक्के भरततोच असे नाही. त्यामुळे या प्रकल्पावरती आधारित असलेली करमाळा बाजूकडील उपसा सिंचन योजना वर्षानुवर्षे बंद स्थितीमध्ये राहते .
2017 पासून जवळपास 4 वर्ष ही योजना बंद होती . थकित वीज बिलामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या योजनेसाठी चा विद्युत पुरवठा खंडित केलेला होता. जलविद्युत विभाग, यांत्रिकी विभाग यांची उपकरणे वर्षानुवर्षे बंद स्थितीत असल्यामुळे अतिशय खराब परिस्थितीमध्ये होती. सिव्हिल विभागाचा कॅनॉल पावसाच्या पाण्यामुळे फुटला होता . झाडे झुडपे वाढल्यामुळे तसेच भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत, रहदारीसाठी पूल बनवलेला नाही यामुळे लोकांनी जागोजाग कॅनॉल बुजलेला होता. अशा स्थितीत कोळगाव प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यासाठी मिळविणे म्हणजे दिवास्वप्नच होते.
परंतु सिना कोळेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत योजना कार्यान्वित करा व वाहून जाणारे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना द्या अशा सूचना दिल्या होत्या . तुम्हाला जिथे कुठे अडचण असेल तिथे मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना सांगा. तुमच्या अडचणी सोडवू .परंतु माझ्या तालुक्यातील गावांना कोळगाव प्रकल्पाचे पाणी मात्र प्राधान्याने मिळाले पाहिजे असे सूचित केले होते.त्यानुसार संबंधित विभागांनी वीज बिल भरणा करण्यापासून ते कॅनल दुरुस्ती , पंपांची दुरुस्ती , वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवरती पूर्ण करून कोळगाव प्रकल्पाचे पाणी आजपासून करमाळा तालुक्यातील नेरले तलावासाठी सुरू करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब नीळ, गौंडरे चे माजी सरपंच सुभाष हनपुडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी नेरले गावचे विद्यमान सरपंच समाधान दौंड, माजी सरपंच अंकुश हंडाळ, युवा नेते माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, सागर काळे सर, युवराज महाडिक, नितीन लटके ,संजय कुंभार, बापू भोसले, दत्ता पन्हाळकर, लखन काळे, शाखा अभियंता भागवत कांबळे, शिंदे साहेब आदी उपस्थित होते.
