चपळगाववाडी यात्रेत भाकरी आमटीचा महाप्रसाद अनेक वर्षांची परंपरा आजही कायम: धार्मिक विधीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल
अक्कलकोट प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत पंचपीठ जगद्गुरूंचे कली युगातील अवतार मानले जाणारे लिंगोद् भव रेणुकाचार्यांची अनेक मंदिरे आहेत. चपळगाववाडी येथेही मंदिर आहे. या यात्रेत महाप्रसाद म्हणून जोड गव्हाच्या खिरीबरोबर कडक भाकरी, आमटी, भाताच्या महाप्रसादाचा बेत असतो. सोबत दूध, तुपाची धार, कैरी, कांदा, काकडी, गाजर, मेथी, लोणचीसुद्धा दिली जाते. पंचक्रोशीतील भाविक प्रसाद घेण्यासाठी गर्दी करतात.
इतर ठिकाणी होणाऱ्या यात्रांमध्ये शिरा, लापसी, खीर, कडी भात असा महाप्रसाद असतो. मात्र चपळगाववाडीच्या यात्रेत हा वेगळा मेनू असतो. धर्मप्रसार, वीरशैव लिंगायत धर्माची शिकवण देण्यासाठी जगद्गुरु रेणुकाचार्य सतत विश्वाच्या भ्रमंतीवर असायचे. ही भ्रमंती करत असताना ज्या ज्या ठिकाणी त्यांनी विश्रांती घेतली, मुक्काम केला त्या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून त्या त्या भागातील भक्तांनी मंदिरे उभी केली आहेत. चपळगाववाडीमध्ये सुद्धा जगद्गुरु रेणुकाचार्यांचे भव्य असे मंदिर आहे. या मंदिराची यात्रा रविवारी 13 एप्रिलपासून सुरू होत आहे. कुस्तीने यात्रेची सांगता होते. जिल्ह्यासह परराज्यातील मल या कुस्तीमध्ये सहभागी होतात. या यात्रेत धार्मिक विधीबरोबरच सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले जातात. नोकरी, व्यवसाय काम, धंद्यासाठी देश-विदेशात असलेली गावासह पंचक्रोशीतील भक्त यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रेत गर्दी असते. यात्रा कालावधीमध्ये मांसाहार, मद्यपान किंवा अमान्य असलेल्या गोष्टीला पूर्णपणे बंदी असते. यात्रेच्या सुरुवातीपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमावर भर दिला जातो. यात्रेत निघणाऱ्या पालखी मिरवणुकीत मानाचे नंदीध्वज मोठ्या डौलाने मिरविले जातात. हे मोठे आकर्षण आहे. हे नंदीध्वज बांधण्याचे काम प्रा. धुळप्पा गोविंदे हे अविरत 25 वर्षांपासून करतात. या कामात त्यांना त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांची मदत होते. पालखी धरण्याचा मान प्रा. धुळप्पा गोविंदे यांचे पुतणे सतीश गोविंदे यांना आहे. प्रा. धुळप्पा गोविंदे हे चपळगाववाडी दहिटणेवाडी, हालहळ्ळी (अ), कर्जाळ, तीर्थ, चपळगाव येथील नंदीध्वज बनवतात.
_________________
९२ वर्षांपासून नाटकाची परंपरा
चपळगाववाडी यात्रेतील कन्नड सामाजिक नाटकाला 92 वर्षांची परंपरा आहे. या नाटकाची सुरुवात स्व. सिद्रामप्पा घोंगडे, धुळप्पा बुगडे, दरेप्पा दोड्याळे, चन्नबसप्पा हत्ते, गुरुमूर्ती स्वामी यांनी सुरू केली होती. आजही युवक कलावंतांनी ही परंपरा चालू ठेवली आहे. यात्रेत समता, सर्वधर्म समभाव, सलोख्याचे दर्शन घडते. नाटकातून सुसंस्कार आणि माणुसकीचे धडे दिले जातात.
-प्रा. विद्या गोविंदे- बिराजदार, भाविक चपळगाववाडी
