करमाळा नगरपालिकेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची माजी नगरसेविका सविता कांबळे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेतील ६२ रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सफाई कर्मचारी म्हणून नगरपालिकेमध्ये घेण्यात यावे. अशी मागणी माजी नगरसेविका सविता कांबळे यांनी केली आहे. याबाबत कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. कोरोना संकट काळात करमाळा नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे राहिले आहे. कोरोनाच्या भीषण महामारीत एक दिवस देखील सुट्टी न घेता त्यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने कोविड काळामध्ये बहुमोल सेवा दिल्याबद्दल रोजंदारीवरील ६२ सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सफाई कामगार म्हणून सेवेत सामावून. घ्यावे व कर्मचाऱ्यांचा उचित सन्मान करावा. असा उल्लेख कांबळे यांनी निवेदनात केला आहे.सदर मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास बावीस नोव्हेंबर रोजी करमाळा तहसील येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून लाक्षणिक उपोषण केले जाईल. असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
