चिखलठाण येथे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयात विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते झाला. यावेळी माध्यमिक, शिष्यवृत्ती परिक्षा, राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती, सारथी संस्थेअंतर्गत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान झाला.
पोलिस निरीक्षक कोकणे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी धाडस व आत्मविश्वास आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी मनोगत व्यक्त करीत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी चंद्रकांत सुरवसे, राजीव कवितके, साहेबराव मारकड, श्रीनाथ गव्हाणे, राजकुमार क्षिरसागर, सुरेश गुटाळ, पोलिस पाटील मारुती गायकवाड, धनेश्वर सरडे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य गुरुराज माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक सचिन खाडे यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ शेंडगे तर आभार लक्ष्मण गोडगे यांनी मानले.
