करमाळा आगारामध्ये प्रवासी विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस नियंत्रण कक्ष दि. 01 ऑगस्ट पासून स्थापन करावा -सौ. प्रियांका गायकवाड
करमाळा प्रतिनिधी – करमाळा आगार हे चार जिल्हयांच्या सिमेवर असणारे सर्वात मोठे आगार आहे. सदर आगारामध्ये चारही जिल्हयातील प्रवाशांची वर्दळ असते. करमाळा आगारामध्ये सध्या चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे प्रवासी हैराण झालेले असून करमाळा शहराचे नांव या भुरटया चोरांमुळे बदनाम होत आहे याकरीता करमाळा आगारामध्ये पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्याकरिता आगार व्यवस्थापक रा.प. करमाळा आगार, करमाळा यांना लेखी निवेदन दिले असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोना कालावधीनंतर जवळपास दोन वर्षांनी शाळा, महाविद्यालयचे चालू झालेले असल्याने ग्रामीणभागातील अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी यांना एस.टी.ने प्रवास करावा लागत आहे. याप्रसंगी करमाळा आगारामध्ये येणाऱ्या अनेक विद्यार्थीनींची छेड काही रोडरोमिओ काढताना निदर्शनास आले आहे. त्यामुळे आगारामध्ये करमाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष दि. 01 ऑगस्ट 2022 पासून सुरू करावे. जेणेकरून प्रवासी व विद्यार्थींनीचा प्रवास सुखकर व सुरक्षित वातावरणात होईल. यापुढे कोणताही अनुचित प्रकार होण्याआगोदर याबाबत तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आगार व्यवस्थापक यांची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला. तसेच सदर निवेदनाच्या प्रती संजनाताई घाडी, शिवसेना प्रवक्त्या तथा सोलापूर महिला जिल्हा संपर्क प्रमुख, मुंबई. पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, सोलापूर. उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा. पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस स्टेशन, करमाळा. सौ. आशाताई टोणपे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, सोलापूर यांना देण्यात आल्या यावेळी भक्ती गायकवाड, सिमरन पठाण, सविता सुरवसे, शिवानी जाधव, कार्तिकी ढोके यांचे सह एस टी डेपोतील बहुसंख्य प्रवासी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
