करमाळाकृषी

पंढरपूरच्या ऊस परिषदेनंतर ‘जनशक्ती’ची गांधीगिरीने आंदोलनाला सुरुवात ▪️ ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकाला हार घालून हात जोडून विनंती

 

‍करमाळा प्रतिनिधी

एकीकडे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी कारखान्याचं धुराडं पेटविण्याची लगबग सुरू केली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन ऊस संघर्ष समितीची स्थापना करत उसाच्या दरासाठी वज्रमुठ आवळली आहे. कारखान्यातून निघणारा धूरच फक्त वाया जातो नाहीतर सर्व घटकांकडून कारखान्याला आर्थिक सोर्स उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला कोल्हापूरच्या धरतीवर ३ हजार १०० रुपये प्रति टन दर मिळावा यासाठी पंढरपूर येथे काल ऊस संघर्ष समितीची परिषद पार पडली.

या झालेल्या ऊस परिषदेमध्ये शेतकरी संघटनेच्या सर्वच नेत्यांनी आक्रमक होऊन शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळवून देण्याची भूमिका व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांनी आज मोहोळ येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकाला हार घालून हात जोडून कारखान्यांचा दर जाहीर होईपर्यंत ऊस वाहतूक न करण्याची विनंती केली.
हा ट्रॅक्टर मोहोळ तालुक्यातील घाटणे येथून सिद्धेश्वर कारखान्याकडे निघाला होता.

यावेळी बोलताना खूपसे-पाटील म्हणाले की, गतवर्षी ट्रॅक्टर चालक मालकांसाठी जनशक्तीने पंढरपूर येथे ट्रॅक्टर मोर्चा आंदोलन उभे केले. यामुळे कारखानदारांनी वाहतूक दरवाढ केली. यंदा आपल्याला शेतकऱ्यांच्या उसाला दरवाढ पाहिजे आहे. यासाठी ट्रॅक्टर मालकांचा सिंहाचा वाटा असू शकतो. जोपर्यंत दरवाढ होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या उसासाठी वाहतुकीचा धंदा बुडेल असा विचार न करता ऊस वाहतूक थांबवली पाहिजे अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी प्रभाकर देशमुख, महेश सोवनी, राणा वाघमारे, प्रशांत पाटील, लखन पेंडे, रोहन नाईक नवरे, अक्षय देवडकर, विठ्ठल कानगुडे, अनिल जाधव, कल्याण गवळी, शरद सपाटे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

▪️ .

error: Don\'t try to copy. Content is protected !!