सरपंच पुस्तकामुळे गावे आणखी समृध्द होतील – ॲड अजित विघ्ने
केतूर ( अभय माने) डिजिटल भारतात आज देखिल शहरे फुगत चालली असुन खेडी ओस पडत आहेत.. त्यामुळे खेडी सुधारली तरच देशाचा खरा विकास होईल. आजही खेडोपाडी रस्ते, पाणी, शौचालय, वीज याबाबत समस्या आहेत, याबाबत अजुनही खेडी स्वयंपूर्ण नाहीत, खेडयात अजुनही रोजगार आणि शिक्षणाचे प्रश्न आहेत.. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक यांनी राजकारण विरहीत एकत्रित येऊन आपल्या गावाला समृद्ध कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे, मत सरपंच पुस्तकाचे लेखक संतोष बिनवडे यांनी व्यक्त केले. केत्तुर ग्रामपंचायत आयोजित लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
मौजे केत्तुर येथील रहीवाशी पत्रकारिता क्षेत्रात पुणे येथे कार्यरत असणाऱ्या लेखिका भावना बाठीया- संचेती यांनी ग्रामपंचायत केत्तुर येथे दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर लेखक संतोष बिनवडे व गणेश सानप लिखित सरपंच हे पुस्तक ग्रामपंचायत सदस्य यांना भेट दिले. यावेळी लेखक संतोष बिनवडे आणि गणेश सानप यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.
सरपंच या पुस्तकातुन कंदर.ता- करमाळा गावच्या सरपंच मनिषा भांगे यांचेसह महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील सरपंचानी केलेल्या विकासकामांची माहीती व त्या अनुषंगाने आपल्याही गावागावात कोणत्या आणि कशा योजना राबविता येतील आणि गावे समृद्ध होतील याबाबतची सविस्तर माहीती दिली आहे. या बरोबरच योजना कशा राबवाव्यात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
सरपंच हे पुस्तक महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती यासाठी दिशादर्शक ठरेल. हे पुस्तक मूळचे वंजारवाडी येथील आणि सध्या अमेरीकेत नोकरी निमित्त वास्तव्यास असलेले संतोष बिनवडे यांनी मोठ्या मेहनतीने हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणले आहे,
गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक यांनी राजकारण विरहीत एकत्रित येऊन आपल्या गावाला समृद्ध कसे करता येईल याबाबत अजित विघ्ने यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
या वेळी लेखिका भावना बाठीया संचेती यांचा ग्रामपंचायत केत्तुर यांचे वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच विलास कोकणे, माजी सरपंच उदयसिंह मोरे- पाटील, माजी सरपंच, ॲड अजित विघ्ने, माजी सरपंच, सुहासशेठ निसळ, माजी उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जरांडे, ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण खैरे, जयकुमार बाठीया, हर्षकुमार बाठिया, पत्रकार राजाराम माने, संतोष ऊर्फ पिंटु कानतोडे, अजिनाथ कनिचे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते…