करमाळासकारात्मकसामाजिक

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा हप्ता पंधरा दिवसात न मिळाल्यास नगरपालिकेला टाळा ठोकण्याचा नानासाहेब मोरे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेत पंतप्रधान आवास योजनेतून ३९८ घरे मंजूर झाली असून या नागरीकांची घराचा हप्ता न मिळाल्याने बांधकाम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे घरकुल धारकांची अवस्था ना घर का ना घाट का.. अशी झाली आहे. या योजनेचा करमाळा शहरात बोजवारा उडाला असून बांधकामाचे हप्ते न मिळाल्याने घरकुल धारकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. येत्या पंधरा दिवसात घरकुलाचा हप्ता न दिल्यास नगरपालिकेला टाळा ठोकू असा इशारा मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिला आहे.
करमाळा नगरपालिकेत पंतप्रधान आवास योजनेची घरकुल योजना चालू आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार या दोघांचा निधी आहे. २०१९ पासून या घरकुलाला एक हप्ता मिळाल्याचे समजते तर काही जणांना एकही हप्ता मिळाला नाही. घरकुल मंजूर झालेले लाभार्थी घरकुल होणार म्हणून अन्य ठिकाणी भाड्याच्या खोलीत रहावयास गेले आहेत. लाभाचा हप्ताच मिळाला नसल्याने बांधकाम बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापासून घरकुलाची निम्मी रक्कम भाड्यापोटीच खर्च झाला आहे. त्यामुळे या घरकुलाचा फायदा होण्याऐवजी लाभार्थ्यांना तोटाच झाला आहे. या घरकुलाची किंमत अडीच लाख असून ज्याचे उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे; अशा लाभार्थ्यांना हे घरकुल मिळते. करमाळा शहरात असे ३९८ लाभार्थींना घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाचा निधी केंद्र व राज्य शासनाने तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा करावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाभार्थींना गेल्या अडीच वर्षापासून घरकुलाचा लाभ मिळाला नाही. उलट या लाभापोटी त्यांचा तोटाच झाला आहे. प्रशासना च्या बेजबाबदार पणामुळे घरकुल लाभार्थ्यांना वेळेत घरकुलाचे हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांना अडीच लाख ऐवजी साडेतीन लाख रूपयाचा निधी घरकुलासाठी शासनाने उपलब्ध करून द्यावा.

– नानासाहेब मोरे (शहरप्रमुख, मनसे)

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group