नफरत छोडो, संविधान बचावो, भारत जोडो’ यात्रेचे ५ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे आगमन यात्रेत सहभागी होण्याचे सुनील सावंत ॲड सविता शिंदे यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ स्वराज इंडिया व विविध जनसंघटनांच्या वतीने कोल्हापूर पासून निघालेल्या ‘नफरत छोडो, संविधान बचावो, भारत जोडो’ यात्रेचे ५ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे आगमन होणार असल्याची माहिती सुनील सावंत व ऍड. सविता शिंदे यांनी दिली. सदरच्या यात्रेची सुरुवात आज रोजी कोल्हापूर येथे स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव व खासदार सतेज पाटील यांच्या उपस्थिती झाली असून कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यात्रेचे स्वागत करतील. यात्रा देगलूर येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होईल.
सुनील सावंत पुढे म्हणाले की, ‘नफरत छोडो, संविधान बचाओ, भारत जोडो’ यात्रेचे ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४:३० वा. करमाळा येथे आगमन होईल. करमाळा एस. टी. स्टँड येथे यात्रेचे स्वागत करून यात्रा मेन रोडने महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहचेल तिथे जाहीर सभा घेण्यात येईल. जाहीर सभेत बी. आर. पाटील, मा. आमदार कर्नाटक, ललित बाबर, ध्यायक्ष स्वराज इंडिया महाराष्ट्र, सुभाष लोमटे उपाध्यक्ष हमाल मापाडी संघटना, महाराष्ट्र ई. नेते मार्गदर्शन करतील.
ऍड. सविता शिंदे म्हणाल्या की, देशातील वाढती महागाई, लोकांची दिशाभूल करून धार्मिक भेदभाव धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे, भ्रष्टाचार, ठराविक उद्योगपतींची वाढणारी अमाप संपत्ती, संविधान मोडीत काढण्याचे सत्ताधाऱ्याचे प्रयत्न यामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्रितपणे अशा धर्मांध, सामान्यांचे शोषण करणाऱ्या सत्तापिपासू शक्तीशी लढणे आवश्यक आहे. त्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे चांगली सुरुवात केली आहे. त्यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ, भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
