करमाळासकारात्मक

****** गावगाडा *********** …… ( हितं प्रत्येकानी आपापल्या गावी जायचं अन- जरा विचार करायचा )……… ———–

*
———–
आता आपण यावेळी जरा विचार करू गावगाडा कारण गावगाडा ही व्यवस्था आता जरी एवढी प्रचलित नसली तरी ती एक व्यवस्था होती आता प्रश्न पडतो की व्यवस्था मग आता कुठे गेली का तर सर्व व्यवस्था हे शासन चालवतं आणि त्यामुळे आपल्याला याचा सर्व वृत्तांत पोहोचायला जरासा वेळ लागतो क्वचित प्रसंगी आपल्या पर्यंत पोहोचत सुद्धा नाही
आता आपण लेखाचा विचार करण्यापूर्वी जरा थोडी वास्तवता पाहू कारण सर्वसाधारण माणसाला गाव ही संकल्पना भुरळ घालीत असते झुकू झुकू झुकू आगीनगाडी….. मामाच्या गावाला जाऊया या बालगीतातून ती त्याच्या भाव विश्वामध्ये प्रवेश करत असते माणूस हा आयुष्यभर गावाशी जोडला जातो. गाव म्हटलं की त्याच्यासमोर डोंगराच्या कुशीत वसलेलं…हिरव्यागार वनराईनं नटलेलं… वाऱ्याने झुलणाऱ्या शेतांनी भरलेलं…असं निसर्गरम्य चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं शहरांमध्ये राहणाऱ्या बहुतेक जणांची माझं शहरातील वास्तव्य जे आहे कायमस्वरूपी नाही अशी भावना असते याच भावनेतून वर्षातून दोनदा तो आपल्या गावी जात असतो पूर्वी खूप काळापूर्वी माणसाला शेतीचा शोध लागला आणि तो भटके जीवन सोडून शेती करू लागला एके ठिकाणी स्थिर झाला अन असं एकोप्यानं कित्येक जण तरी एकत्र आली आणि त्यावेळी गावाचा जन्म झाला लोकसंख्येचा निकष लावून शब्दाची व्याप्ती झाली त्याच्यामध्ये वस्ती… वाडी किंवा वाडा… गाव किंवा खेडं… पूर… पेठ… नगर…गोष्टींमध्ये असतं तसं आटपाट नगर म्हणजे आठ पेठांच नगर तर बाजारपेठा आठच का तर गावाच्या आठही दिशेला वसलेल्या त्या बाजारपेठा तर कोणत्या दिशेला कोणती पेठ असावी याचे सुद्धा काही ठिकाणी नियम होते
तसंच आता आपण जरा विचार करू काही ठिकाणी खुर्द व बुद्रुक अशी अवस्था पाहायला मिळते तर काही गावाच्या संदर्भात याचा अर्थ मूळ अथवा जुनं गाव असतं आणि कालांतराने नदीच्या पलीकडे सुद्धा छोट्या वस्तीची वसाहत वसते अशावेळी मूळ वस्तीला मूळ गावाच्या नावापुढे खुर्द लावून नामकरण केलं जातं उदाहरणार्थ बाभूळगाव बुद्रुक म्हणजे जुनं बाभूळगाव आणि बाभूळगाव खुर्द म्हणजे नवीन वस्ती नदीच्या पलीकडे असणारी आणि गावगाड्या बद्दल बोलायचं झालं तर कुठल्याही गावच्या बस थांब्यावर उतरला तर आजूबाजूला दुकानांची हॉटेलची गर्दी चक्रावून जायला होतं एकदा असा विचार डोक्यात येतो की एवढ्या लहान गावात एवढी हॉटेलं आणि दुकानं डोळ्यावर विश्वास बसत नाही आजूबाजूच्या बस थांब्याच्या भोवताली अंतरा अंतराने तरुणांची टोळकी दिसतात रिकामटेकडे तरुण इकडे तिकडे हिंडताना दिसतील कोणी सिगारेट ओढताना तर कोणी गुटखा खाऊन पटकन थुंकताना दिसतील कुठे राजकारणाच्या गप्पांचा रंगलेला फड दिसल जागोजागी राजकीय पक्षांच्या आणि संघटनेच्या पाट्या तर हव्याच नाही का शेताकडे कामाला जाताना प्रौढ व्यक्ती व वृद्ध मंडळी दिसतील आजचे तरुण पत्त्याच्या डावावर नाहीतर गुत्त्यात बसलेली दिसतील
बऱ्याचदा झाडांची कत्तल झालेली दिसेल आणि आता गावागावांमध्ये तर सिमेंटचं जंगल उभा राहायला सुरुवात झाली आहे प्रत्येक घरावर डिश अँटेनाचा ध्वज दिसू लागतो गावातील प्रत्येक वृद्ध म्हणतोय गावाची तर रयाच गेलीयं काम करायची तरुणांमध्ये धमकच राहिली नाही शेतामध्ये काम करायची तरुणाला लाज वाटते काम धंदा सोडून टी व्ही बघण्यात वेळ घालवतात हातात पैसा आला पण शिस्त निघून गेली आता सगळं उलट झालंय पूर्वी गावांमध्ये दोन-चार माणसं प्यायची ती पण इकडून तिकडून आणायची स्वतःच्या झोपडीत ढोसायची आता सगळं उलटं झालंय न पिणारी दोन चार राहिल्यात सगळं गाव पिऊन झुलतय कोणाला कोणाचा धाक म्हणून राहिला नाही पोरगं बापाला चुना मागतयं कसली आली प्रगती आणि म्हणूनच आपण जरा पूर्वीचा गावगाडा कसा होता त्याच्यावर नजर टाकू…
तर आता यासाठी आपणाला सुमारे 80 वर्ष किंवा त्यापूर्वीच वातावरण व व्यवस्था डोळ्यासमोर आणावी लागेल कारण दुसऱ्या बाजूने विचार केला तर माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो एकटं राहण्यापेक्षा समूहाने राहणं पसंत करतो आणि यातूनच या विचाराचा आणि प्रणालीचा जन्म झाला माणूस हा वस्ती करून राहू लागला त्यातून वाड्या व गावांची निर्मिती झाली आणि गावगाड्यासाठी प्रमुखांची आवश्यकता निर्माण झाली त्यातून विविध पदांची निर्मिती करण्यात आली कालांतराने या पदाची नोंद ठेवण्याची प्रथा सुरू झाली आणि यातूनच गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा निर्माण झाली त्याला बलुतेदार…जमीनदार…व इनामदार…इत्यादी संज्ञा प्राप्त झाल्या गावातील प्रत्येक घटकांचा कारभार करण्यासाठी विविध पदं उदयास आली
या पदांना पाटील…कुलकर्णी…चौगुले…देशमुख… देशपांडे…शेटे… महाजन…अशी नावं देण्यात आली कालांतराने या पदाचे महत्व एवढं वाढलं की पदनामं आडनावं म्हणून स्वीकारली गेली दुसरी गोष्ट अशी की वरील गावकऱ्यांचा म्हणजे ग्रामस्थांचा कारभार नीट चालावा म्हणून प्राचीन राज्यकर्त्यांनी या वतन संस्थेला मान्यता दिली मग राजे सुद्धा आपल्या मर्जीतील व्यक्तींना नाहीतर विशेषता नातलगांना गावं इनाम देऊ लागले ते आपल्या हुशारीने किंवा पराक्रमाने राज्य मिळवण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी राजांना मदत करत असायचे
त्यांना अशी इनामं मग कायमच मिळत असायची शासन व्यवस्थित उच्च अधिकार पदासाठी ही अशी जमीन तोडून देण्याची प्रथा सुरू झाली राजे किंवा सरदार हे देवालयाच्या योगक्षेमासाठी ही जमीन व गावे ईनाम देऊ लागले अशाप्रकारे वतनदारी ही पद्धती राजमान्य ठरली वतनदारीचे दोन प्रकार राजाला हवी असेल तेव्हा लष्करी किंवा इतर मदत देण्याच्या अटीवर जी वतने दिली जातात त्याशिवाय बलुतेदार म्हणजे गावात उपलब्ध असणारे विविध कारागीर कामगार जी गावासाठी विशिष्ट सेवा करीत असे याबद्दल त्यांच्या मोबदल्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून कायमस्वरूपी सुगीच्या दिवसात खळ्यावरून धान्य मिळत असायचं
सुगीच्या दिवसात खळ्यावरून धान्य घेऊन जायचं अशी प्रथा असायची ग्रामव्यवस्थेमध्ये पाटील हा सर्वात मोठा वतनदार त्या खालोखाल देशमुख किंवा देश ग्रामकुट होते पाटील हा जसा गावचा राजा तसा देशमुख हा आपल्या हाताखालच्या प्रदेशाचा नायक असे वतनदारांना आपल्या वतनाचा व अधिकाराचा मोठा अभिमान वाटत असायचा ग्रामव्यवस्था ही प्रत्येक गावात होती तिचा कारभार ग्रामपंचायत सभा करायची मात्र कुठेतरी ही व्यवस्था थोडी बदलली आणि ग्रामीण भागात देशक सत्ता आली देशमुख…देशपांडे… पाटील…कुलकर्णी… चौगुले… आधी प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून देशक म्हणत असायचे गावच्या कारभारासाठी ज्या सभा भरायच्या त्यामध्ये बारा बलुतेदार…शेतकरी… जोशी…या सर्व जनपदस्थ लोकांचा समावेश असायचा राजसत्ता बदलली तर अधिकारी बदलत पण लोक व्यवहाराचा कणा बनलेली वतनदार मंडळी कायम असायची त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कडे कपारी अनेक खेडी होती प्रत्येक गाव बव्हंशी स्वयंपूर्ण होती गावात शेती खेरीज कारागिरी करण्यास बलुते अशी संज्ञा होती
त्यांना पोटा करता जमिनीच्या उत्पन्नानुसार धान्य आदी वस्तू मिळत असायच्या प्रसंगी जमीन पण इनाम मिळायची आता वतन तसं पाहिलं तर हा शब्द अरबी म्हणजे बघा ज्याचा अर्थ देश… वतन… जन्मभूमी…गावासाठी…किंवा देशासाठी… करत असलेल्या कर्तव्यासाठी अशा व्यक्तीला वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न हे मिळत असते ते म्हणजे वतन होय वतन धारण करणाऱ्याला वतनदार म्हणतात इनामदार…जहागीरदार…मनसबदार… हे एकाच संकल्पनेमध्ये मोडतात वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असायचे पूर्वी काम वाढल्यामुळे पाटलांची पोलीस पाटील आणि मुलकी पाटील अशी दोन पदं निर्माण झाली गावातील सर्वच कार्यक्रमांमध्ये पाटलांचा मान पहिला स्थानिक पातळीवरील पोलीस व न्यायाधीश अशा सर्व भूमिकेमध्ये पाटलाचे महत्त्व होते कुलकर्णी गाव पातळीवर पाटलांना मदत करायचे गावचे रेकॉर्ड लिहिणारा महत्त्वाचा अधिकारी तर कुळवाडी लोकांच्या कुळावर ते कर आकारणी करीत असे शेकडो वर्षापासून कसत असलेली जमीन त्याला कुळ किंवा कुळवाडी म्हणायचे गुरव… जोशी… कोतवाल… शेटे…आणि महाजन… देशमुख… देशपांडे…देसाई… इत्यादी घटक गावचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सहभागी असायचे
बारा बलुतेदारांमध्ये चौगुला… कोतवाल…सुतार…लोहार…चांभार… कुंभार… न्हावी… सोनार…जोशी…परीट… गुरव… आणि कोळी… हे प्रामुख्याने 12 बलुतेदार म्हणून प्रसिद्ध होते आता ज्यांच्या वाचून शेतकऱ्यांचे नडत नाही पण जे शेतकऱ्यांच्या नैमत्तिक गरजा भागवतात ते आलुतेदार त्यामध्ये तेली…तांबोळी…साळी…सनगर…शिंपी…माळी…
गोंधळी… नाथपंथी डवरी गोसावी…भाट…ठाकर… गोसावी…मौलाना…वाजंत्री…घडशी… कलावंत… तराळ…कोरव…भोई…या 18 जातीचे बांधव समाविष्ट असायचे आता बघा बलुतेंदाराची एकंदर संख्या 12 होती बलुतेदाराचे नाव इलाख्यानुसार बदलायची तेली हिंदू असायचे तर मौलाना मुस्लिम समाजाचे असायचे यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावामध्ये बाराही बलुतेदार असतीलच असं नाहीये ज्या गावांमध्ये बलुतेदार नाही अशा गावात आलुतेदार हे बलुतेदाराचे काम पाहायचे मुस्लिम इलाख्याचे बलुतेदार आत्तार…कुरेशी…छप्परबंद… तांबोळी… पिंजारी म्हंजे नदाफ…फकीर…बागवान…मदारी…मन्यार… मोमीन…मिरगर…शिकलगार…अशी वैभवशाली नावं धारण केलेली असायची त्याचप्रमाणे कासार… कोरव… गोंधळी…गोसावी…घडशी…ठाकर…डवऱ्या मैराळ… तांबोळी… तेली…भट… भोई…माळी…जंगम…वाजंत्री… शिंपी… सनगर… साळी… या 18 कामगारांचा समावेश अलुतेदारामध्ये होत होता याशिवाय इतरही भटक्या जाती जमातीचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा वाटा होता आता काही ठिकाणी वरील अलुतेदारांच्या यादीमध्ये विसंगती म्हणजे वेगळेपणा जाणवतो, बलुतेदार आणि अलुतेदार हे सर्व गाव कामगार गावात असणाऱ्या ग्रामदैवताच्या यात्रेत व लग्न समारंभामध्ये सहभागी व्हायचे काही ठिकाणी यांना विशेष मान असायचा उदाहरणार्थ गावच्या जत्रेमध्ये पालखीच्या वेळी किंवा मंदिरावर ध्वज लावताना…
तसंच आपल्या गावात येणारे काही पाहुणेमंडळीच्या स्वरूपात फिरस्ते पण असायचे त्यातील काही उपयोगी फिरस्ते…करमणूक करणारे फिरस्ते…आणि भिक्षा मागणारे म्हणजे धार्मिकतेच्या माध्यमातून भिक्षुकी करणारे असे समाज बांधव असायचे तर आपण जरा त्यांचा विचार करू प्रथम उपयोगी फिरस्ते हे सहसा गावातील पार…चावडी… अथवा मंदिराच्या आसपास पालं टाकून वास्तव्य करीत असायचे त्यामध्ये घिसाडी… बेलदार… पांथरवट…लमाण…किंवा वंजारी… वैदू…कुडमुडे ज्योशी..कैकाडी… तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर संबंधित फिरस्ते थोडीशी गावकऱ्यांची करमणूक करायचे आणि मोबदल्यामध्ये अपेक्षा करायचे त्यामध्ये गारोडी…माकडवाले… नंदीबैलवाले उर्फ निरमल…दरवेशी म्हणजे अस्वल…चित्रकथी म्हणजे कटपुतली…बहुरूपी…कोल्हाटी…, डोंबारी…वासुदेव… त्याचप्रमाणे नुसती भिक्षुकी करणारी ही गाव जिवंत असल्याचा धार्मिक असल्याचा आणि गाव किती मायाळू असल्याचा पुरावा द्यायचे त्यामध्ये भोपे हे खंडोबाचे असायचे म्हणजे त्यांना वाघे म्हणायचे…भगत म्हणजे भूत्ये हे देवीचे असायचे त्यांना आराधी म्हणायचे… वाघ्या मुरळी… पोतराज… कानफाटे म्हणजे नाथपंथी… उदासी… अघोरी…गोसावी…जोगती…किंवा जोगिणी.. बैरागी…साधू…फकीर…तसं बघायला गेलं तर ही यादी खूप मोठी आहे
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ती म्हणजे हे फिरस्ते सुद्धा गावगाड्याचे एक घटक होते व एकदा वेशीच्या आत आलेला प्रत्येक माणूस हा गावची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कारणीभूत ठरायचा आणि या घटकांचा पण गावाला एवढा लळा लागला होता की चार बायका गप्पा मारता मारता सहज बोलून जायच्या बया लय दिवस झालं वासुदेव… नंदीबैलवालं…गावात आलचं न्हाईतं ते गावात आल्यावर किमान महिना दोन महिने तरी त्यांचं वास्तव्य गावात असायचं रोज सकाळी उठून नवीनच आजूबाजूच्या गावात किंवा वाडी वस्तीवर त्यांचा फेरफटका असायचा हा त्यांचा दिनक्रम व जीवनचर्या होती आणि याच 10-20 पालांच्या रगाड्यामध्ये त्यांच्याच समाजाची जात पंचायत भरवून लग्नकार्य किंवा मोठा धार्मिक विधी उरकला जायचा कारण त्याकाळी खरोखरच ते एक गावाचं वैभवच होतं
****************************************
किरण बेंद्रे
पृथ्वी हाईट…कमल कॉलनी
पुणे
7218439002

error: Don\'t try to copy. Content is protected !!