करमाळा येथील सूरताल संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक गायन वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी यश कल्याणीचे संस्थापक अध्यक्ष प्रा गणेश करे पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोळंकी स्मार्ट ब्रेन इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ कोमल सोळंकी या होत्या. यावेळी गणेश करे पाटील म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपोर्णिमा. गुरुपौर्णिमा हा भारतातील गुरू शिष्य परंपरेची माहती सांगणारा एक उत्सव आहे. गुरू आपल्या शिष्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारचे सुयोग्य शिक्षण देत असतात. ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ असे देखील म्हटले जाते. आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपोर्णिमा हा सण गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा सण आहे. आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचवण्यासाठी गुरुच आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरुविषयी प्रेम आदर व कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले. यावेळी करे पाटील यांनी सुरताल संगीत विद्यालयास स्मार्ट टीव्ही देण्याचे जाहीर केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरु विषयी आपली मते व्यक्त केली. तसेच भावगीते, भक्ती गीते, बालगीते अभंगवाणी इत्यादी गीत प्रकार आपल्या सुरेल आवाजाने सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दिगंबर पवार तर आभार डॉ स्वाती घाडगे यांनी मानले.
