डिकसळ- कोंढार चिंचोली नविन पुलाच्या निविदा प्रस्तावास मंजुरी -आमदार संजयमामा शिंदे 3 जिल्ह्यांना जोडण्याचा मार्ग होणार सुकर
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील 3 जिल्ह्यांच्या सिमेवर असणारा ब्रिटीश कालीन डिकसळचा पुल खचला आणि जड वहातुक बंद झाली. सदर पुलाची किरकोळ दुरुस्ती करून हलक्या वाहनांची वाहतूक सदर पुलावरून सुरु आहे .परंतु करमाळा तालुक्यासह 3 जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचा प्रश्न महत्त्वाचा होता, त्यासाठी आ.संजयमामा शिंदे यांनी 55 कोटी रुपयांची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मिळवली होती. सदर कामावरती नवीन सरकारने स्थगिती दिलेली होती ,ती स्थगिती उठवून प्रत्यक्षात त्या पुलांचे कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने पुलाच्या 38 कोटी 66 लाख 31 हजार 470 रुपयाचे निविदा प्रस्तावास आज दिनांक 26 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, डिकसळ पुलासाठी एकूण 55 कोटी निधी मंजूर असून सदर पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम उर्वरित निधी मधून केले जाणार आहे. त्याचे टेंडर नंतर निघणार आहे. डिकसळ पुलाचे काम विजय एस. पटेल शिरपूर, धुळे या कंपनीला मिळाले असून 2 वर्षांमध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
चौकट…
भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली…
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजुरी मिळालेल्या व आता अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होऊन सत्तेत सहभागी झालेल्या सरकारने सदर पुलाच्या निविदा प्रस्तावास मंजुरी दिली असून त्याचे कामही प्रत्यक्षात सुरू झाले आहे .या डिकसळ पुलाचे भूमिपूजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वेळ आपण मागितली असून त्यांनी वेळ दिल्यानंतर डिकसळ पुलाचा भूमिपूजन समारंभ होईल अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
