करमाळ्यात शिवमहापुराण कथेचा आज समारोप; महाआरती व महाप्रसादाचे आयोजन
करमाळा, प्रतिनिधी
पवित्र अधिक मासानिमित्त करमाळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवमहापुराण कथेचा समारोप गुरुवार, 21 मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे. आजची कथा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार असून कथेनंतर महाआरती, सजीव झाकी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य यजमान श्री श्रेणिकशेठ खाटेर यांनी दिली. या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवशी झी टॉकीज फेम सुश्री स्नेहगंगा माई आळंदीकर यांनी आपल्या समधुर वाणीतून रसाळ निरूपण करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कथेदरम्यान शिवभक्तीचा अनोखा माहोल निर्माण झाला होता. विशेष म्हणजे दीपोत्सवानिमित्त महिलांनी मोठ्या उत्साहाने पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून सहभाग घेतला. तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश अर्थात श्री दत्तात्रेय यांच्या पाळण्याचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. पाळणादरम्यान विशेष वाण, चॉकलेट गोळ्या आणि विविध आकर्षक उपक्रमांमुळे बालकलाकारांनी जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
या शिवमहापुराण कथेमध्ये विधेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता यांसह विविध संहितांतील प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. रुद्रसंहितेतील सृष्टी खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंडातील विविध प्रसंग कथेद्वारे साकारण्यात आले. त्यामुळे रोजच्या कथेमध्ये संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. शिवमहापुराणात एक लाख श्लोक असून त्यातील निवडक प्रसंगांचे भावपूर्ण निरूपण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महिला भाविकांनी फुगडी खेळून भक्तीभाव व्यक्त केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीतील फुगडी हा स्त्रीशक्तीचा, आनंदाचा आणि उत्साहाचा आविष्कार मानला जातो. टाळ्यांच्या तालावर आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत महिला भक्त देवाच्या चरणी लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या धार्मिक सोहळ्यास शहरातील व्यापारी, डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक, शिक्षक, केमिस्ट, उद्योजक, शेतकरी, वकील, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, अध्यात्मिक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमासाठी नगरसेवक संजय सावंत, नगराध्यक्ष मोहिनी संजय सावंत, ॲड. संकेत खाटेर, मोक्षदा खाटेर, कन्हैयालाल देवी, सुनीता देवी, श्रेणिकशेठ खाटेर, संगीता खाटेर, ॲड. विक्रांत घुमरे, डॉ. रोहन पाटील, उद्योजक संतोष काका कुलकर्णी, जगदीश शिगची, विठ्ठलराव भणगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे प्रदीपशेठ बंलदोटा विकीशेठ मंडलेचा यांच्यासह अनेक मान्यवर यजमान म्हणून लाभले. तसेच संयोजन समितीतील जगदिश शिगची नगरसेवक दीपक चव्हाण, पत्रकार दिनेश मडके, रवींद्र विद्वत, श्रीपाद आडकर सर , कालिदास घोगरे नवनाथ चौधरी हनुमानसिंह परदेशी,रंजना कुरुलकर, आशाबाई देशमुखे, आशिष बोरा ,गणेश बोरा प्रदीप देवी, वैभव दोशी चक्रधर पाटील बाळासाहेब नरारे दिनेश मुथ्था भावना गांधी, कविता निळ, राणी महाडिक, स्वाती मसलेकर, वैशाली कोळी, गिरीश शहा, अग्रवाल परिवार, बलदोटा परिवार, पाटणे परिवार, वीर परिवार, संचेती परिवार आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आज समारोपाच्या दिवशी महाआरती, सजीव झाकी आणि भक्तिमय वातावरणात शिवमहापुराण कथेची सांगता होणार असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.


