Tuesday, October 6, 2026
Latest:
Uncategorized

करमाळ्यात वारकरी सेवेचा विक्रम कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानकडून १७,६४३ चहा बिस्कीट पुड्यांचे वाटप

‘करमाळा प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा शहरात राबविण्यात आलेल्या मोफत चहा-बिस्कीट वाटप उपक्रमाने यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तीन दिवस चाललेल्या या सेवाभावी उपक्रमात तब्बल १७,६४३ बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले असून, करमाळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी झालेल्या उपक्रमांमध्ये हा आजपर्यंतच्या इतिहासातील विक्रमी आकडा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दि. १७ ते २० जुलै २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, करमाळा येथे राबविण्यात आला. सकाळी ६ ते सायंकाळी १० या वेळेत हजारो वारकरी व भाविकांना गरम चहा आणि बिस्कीटांचे मोफत वाटप करण्यात आले.
सलग पायी प्रवासामुळे थकलेल्या वारकऱ्यांनी या सेवा केंद्राचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आत्मीयतेने, शिस्तबद्ध नियोजनातून आणि सेवाभावाने प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत करत सेवा दिली. त्यामुळे सेवा केंद्रावर चार दिवस दिवस मोठी गर्दी पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, १७,६४३ बिस्कीट पुड्यांचे वाटप हा केवळ एक आकडा नसून, करमाळ्यातील सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि विठ्ठल भक्तीचा अनोखा संगम असल्याचे नागरिकांनी सांगितले. वारकरी, भाविक आणि नागरिकांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत भविष्यातही अशीच सेवा सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे प्रतीक असून, वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानली जाते. त्याच भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने सामाजिक कार्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
करमाळा शहरात आजपर्यंत वारकऱ्यांसाठी झालेल्या चहा-बिस्कीट सेवा उपक्रमांमध्ये १७,६४३ बिस्कीट पुड्यांचे वाटप हा विक्रमी टप्पा मानला जात असून, या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाने वारकऱ्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण केली असून, करमाळ्याच्या सेवाभावी परंपरेत आणखी एका गौरवशाली अध्यायाची नोंद झाली आहे.याचे सर्व श्रेय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मित्र परिवार करमाळा वासीयांचे असल्याचे सचिन गायकवाड यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!