विजेच्या तीव्र धक्याने पांडे येथील बिभिषण दुधे यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पांडे येथे विजेच्या धक्याने विजेचे काम करणाऱ्या (ठेकेदार) एकाचा मृत्यू झाला आहे. बिभीषण निवृत्ती दुधे (वय साधारण ४५) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. ५) साधारण ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पांडे येथील ही तिसरी घटना असल्याचे समजत आहे. यापूर्वी विजेचे काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी पांडेतील दोघांचा मृत्यू झाला होता, अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती.पांडे येथे विद्युत वाहिनेचे काम करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. एमएसईबीचे ठेकेदार संतोष दुधे यांचे ते चुलत बंधू असल्याचे समजत आहे. विजेचा धक्का बसल्यानंतर त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा नगरपालिकेचे त्यांनी ठेकेदार म्हणून काम केले होते.
