भुमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना त्रास, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मनसेची मागणी
करमाळा-प्रतिनिधी
शेती व प्लाॅट कामातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जनता भूमी अभिलेख कार्यालयात येत असते. जमिनी संबंधी क प्रत, नकाशा, आखीव पत्रिका व विविध दाखल्यांसाठी करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात जनतेची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. कार्यालयातील भोंगळ कारभाराचा फटका सामान्यांना बसत असुन, याची चौकशी करण्याची मागणी करमाळा मनसेच्यावतीने तालुका प्रमुख संजय घोलप यांनी पुणे येथील भुमिअभिलेख उपसंचालक किशोर तरवेज यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करमाळा तालुक्यात शेती व प्लाॅट संबंधी कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक भूमी अभिलेख कार्यालयात येत असतात. कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करीत अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. भूमी अभिलेख कार्यालयात क प्रत, आखीव पत्रिका, नकाशे व इतर कामासाठी पावती कपात केली जाते. नियमानुसार कागदपत्रे दोन ते तिन दिवसात द्यायला पाहिजेत. मात्र ते देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. आडमार्गाने मात्र त्वरित देण्याचा घाट केला जात आहे. सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा सपाटा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे. शेती संबंधी दररोज शेकडो लोक येत असताना मात्र चिरीमिरी घेऊनच कामे केली जातात. उर्वरित लोकांना मात्र कारणे पुढे करुन नंतर येण्याचा सल्ला दिला जातो. याठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांमध्ये नसलेल्या समन्वय याच्या अभावाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देऊन, येथील भुमि अभिलेख कार्यालयातील कारभाराची दखल घ्यावी. अशी मागणी संजय घोलप यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, आणि मनसे पदाधकारी उपस्थित होते.
