सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन वृद्धांना मदत हाच खरा धर्म – डॉ. सुनिता दोशी
करमाळा प्रतिनिधी करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार वृद्धांना मागील साडेचार वर्षापासून अन्नपूर्णा योजनेतून दोन वेळचे जेवण दिले जाते.
दरवर्षी प्रमाणे यंदा करमाळ्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या क्षितीज ग्रुप या महिलांच्या संघटनेने अन्नपूर्णास जीवनोपयोगी वस्तू भेट दिल्या. त्याप्रसंगी क्षितीज ग्रुपच्या डॉ. सुनिता दोशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की ,’निराधार वृद्धांना मदत करणे हाच खरा धर्म आहे. आशा निराधारांची दिवाळी प्रकाशमान होण्यासाठी समाजातील घटकांनी त्यांना असा मदतीचा हात दिला पाहिजे.’
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य श्री भीष्माचार्य चांदणे म्हणाले की ‘पोटाची भूक ही सर्वात महत्त्वाचे असते. अन्नासाठी येथे कोणीही वणवण फिरता कामा नये. कोणीही उपाशीपोटी येथे झोपू नये हा वसा श्रीराम प्रतिष्ठानने उचलला आणि मागील साडेचार वर्षांपासून आतापर्यंत तो समाजाच्या सहकार्याने पूर्णत्वास नेलेला आहे.’ क्षितिज ग्रुप दरवर्षी या कार्यात मनापासून सहभागी होतो म्हणून या संपूर्ण ग्रुपचे त्यांनी कौतुक केले. तसेच प्रतिष्ठानचे सदस्य श्री विलास आबा जाधव यांनी आपल्या भाषणातून क्षितिज ग्रुपला त्यांच्या या कार्याबद्दल धन्यवाद दिले.
याप्रसंगी क्षितिज ग्रुपच्या सदस्या सौ.माधुरी साखरे, मंजू देवी, नलिनी जाधव,स्वाती माने, सौ.येवले, उज्ज्वला देवी तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य विलास आबा जाधव महाराज, संग्रामसिह परदेशी, महादेव गोसावी आणि भीष्माचार्य चांदणे उपस्थित होते.
