रेल्वे भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टरला अपघात सुदैवाने जीवीत हानी नाही रेल्वे प्रशासन कधी जागे होणार
राजाराम माने केत्तूर प्रतिनिधी पारेवाडीहून बारामती ॲग्रो कारखान्याकडे निघालेला उसाने भरलेला ट्रॅक्टर भगतवाडी (ता.करमाळा) गेटजवळ आज सायंकाळी चारच्या दरम्यान कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे.ट्रॅक्टर पडला त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या होत्या परंतु ट्रॅक्टर डाव्या बाजूला पडला आणि झोपड्या उजव्या बाजूला होत्या. ट्रॅक्टर उजव्या बाजूला पडला असता तर जीवितहानी झाली असती.रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाला जोडणारे रस्ते पक्के करावेत अशी मागणी ऊस वाहतूक दाराकडून होत आहे. सोलापूर पुणे रेल्वे महामार्ग ग्रामीण भागातून जात असून पूर्वी रेल्वे गेट असताना रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरण कामानंतर ठिकाणावरील रेल्वेगेट बंद करण्यात आली परंतु पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाला रेल्वे गेट बंद करता येत नाही असे असताना पारेवाडी, रामवाडी, भगतवाडी येथील रेल्वेगेट बंद करून भुयारी मार्ग चालू करण्यात आला परंतु या भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाची झाले आहे पण प्रत्येक ठिकाणी थोडा पाऊस झाला तरी या भुयारी मार्गात पाणी साचत आहे.तसेच भुयारी मार्गाला जोडणारी रस्ते कच्ची असल्याने या मार्गावर घसरण होत आहे.शेतकऱ्यांना मालवाहतूक करताना जणू काही मरणाच्या दाढीतून जावे लागत आहे.ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने उसाचे ट्रॅक्टर ट्रक तसेच केळीचे कंटेनर रेल्वे गेट चालू होती त्यावेळेस सहजासहजी रस्त्यावरून रेल्वे ट्रॅक ओलांडून जात होते परंतु रेल्वेने उड्डाण पूल न करता पैसे वाचविण्यासाठी रेल्वे भुयारी मार्गाची कामे केली परंतु ही कामे कंत्राटदाराने अपुरी ठेवून शेतकऱ्यांची मालवाहतुकीसाठी अडचण करून ठेवली आहे या रस्त्याचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची जड वाहतूक करताना व केळीची जड वाहतूक करताना वाहने त्या रस्त्यावर फसत असून व्यक्तींच्या जीवितास व वाहनास तसेच शेतीमालास धोका होत असून रेल्वे प्रशासन नक्की कधी जागे होणार आणि होणाऱ्या जीवित व आर्थिक नुकसान भरपाईस रेल्वे व संबंधित अधिकाऱ्यांस का जबाबदार धरले जाऊ नये ? असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे.
