दत्तकला इंजिनिअरिंग कॉलेजचा ‘एनव्हिडिया’ कंपनीसोबत सामंजस्य करार कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नवे दालन – प्रा. रामदास झोळ.

भिगवण प्रतिनिधी – दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अंतर्गत असलेल्या दत्तकला इंजिनिअरिंग कॉलेजने जगातील सर्वात मूल्यवान सेमीकंडक्टर व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘एनव्हिडिया’ (NVIDIA) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांना AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डीप लर्निंग आणि हाय परफॉर्मन्स कंप्यूटिंग (HPC) या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, प्रयोगात्मक अनुभव आणि प्रकल्पाधारित शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.एनव्हिडिया’ ही अमेरिकन कंपनी असून अलीकडेच तिचे बाजारमूल्य पाच ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. जागतिक स्तरावर AI चिप्स व सुपरकंप्युटिंग तंत्रज्ञान विकसित करणारी ही सर्वात मूल्यवान कंपनी ठरली आहे.या MoU अंतर्गत दत्तकला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये “एनव्हिडिया सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI” स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रातून विद्यार्थी व प्राध्यापकांना उद्योगमान्य प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प, नवोपक्रम उपक्रम आणि करिअर वाढीसाठी जागतिक प्लॅटफॉर्म मिळणार आहे.एनव्हिडिया’चे Business Head श्री. पाठक यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले, “दत्तकला शिक्षण संस्था भारतातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आम्हाला या संस्थेशी सामंजस्य करार (MOU) करताना अभिमान वाटतो. आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे प्रत्येक उद्योगाचे केंद्र बनले आहे. या क्षेत्रातील कौशल्य असलेले विद्यार्थी भविष्यातील नेते ठरतील.”कार्यक्रमाच्या प्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “तंत्रज्ञान क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. अशा अग्रगण्य जागतिक कंपन्यांशी झालेले करार विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहेत. पुढील काळ हा AI आणि सेमीकंडक्टर क्रांतीचा काळ असेल आणि आपल्या विद्यार्थ्यांनी यात अग्रेसर राहावे, हेच आमचे ध्येय आहे.”संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, “दत्तकला संस्थेचे ध्येय हे नेहमीच उद्योगाभिमुख शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवणे आहे. ‘एनव्हिडिया’ सोबतचा हा करार विद्यार्थ्यांच्या नवकल्पनाशक्तीला आणि रोजगारक्षमतेला नवे पंख देईल.”या उपक्रमामुळे कॉलेजचे विद्यार्थी नव्या तंत्रज्ञानातील संशोधन, डिझाइन आणि उद्योग प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊ शकतील. प्राचार्य डॉ. एस.ए. पाटील, डायरेक्टर प्रा. श्रीकांत साळुंके, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


