करमाळा

समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून …आत्मनिर्भर करण्याचा क्षितिज ग्रुपचा दिव्यांग सत्कार उपक्रम प्रेरणादायी – नगराध्यक्ष सौ मोहिनी सावंत


करमाळा प्रतिनिधी
समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी देणारा क्षितिज ग्रुपचा दिव्यांग सत्कार उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असे प्रतिपादन करमाळा नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष सौ. मोहिनी संजय सावंत यांनी केले.
क्षितिज ग्रुप, करमाळा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती व लुईस ब्रेल स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग भगिनी व बंधूंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सौ. मोहिनी सावंत, नगरसेविका सौ. चैताली सुनील सावंत, करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, स्नेहालय इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार जयंत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला भगिनींना शिक्षणाची दालने खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिव्यांग बंधूंना ट्रॅव्हल बॅग व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच दिव्यांग भगिनींचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समाजात आत्मनिर्भरतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.
कार्यक्रमात दिव्यांग भगिनी सौ. स्वाती माने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आम्हीही समाजाचा अविभाज्य घटक आहोत. परमेश्वराने आम्हाला बुद्धी व स्पर्शज्ञान दिले आहे. आम्ही कुठेही कमी नाही. मात्र आम्हाला हक्काचा रोजगार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.”
यावेळी त्यांनी करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून गृहउद्योग, लघुउद्योग व बायो-प्रॉडक्ट निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली. तसेच उद्योग-व्यवसायासाठी एक गाळा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. तीन टक्के अपंग निधी थेट वाटप न करता तो निधी दिव्यांगांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी वापरण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी बोलताना सौ. स्वाती जाधव माने यांनी करमाळा शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा – पाणीपुरवठा, गटार स्वच्छता व रस्ते – याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. ही कामे प्रभावीपणे झाल्यास नागरिक निश्चितच नगरपालिकेच्या कार्याचे कौतुक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सुनीता दोशी, दिव्यांग भगिनी सौ. स्वाती माने, पत्रकार दिनेश मडके, पत्रकार जयंत दळवी तसेच नगरसेविका सौ. चैताली सुनील सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी क्षितिज ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक करत समूहाच्या भावी सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ. मोहिनी संजय सावंत व नगरसेविका सौ. चैताली सुनील सावंत यांचा क्षितिज ग्रुपच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष सौ. मोहिनी सावंत म्हणाल्या, “करमाळा शहरातील सर्व प्रश्न नगरसेवक, प्रशासन व नागरिक यांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. दिव्यांग बंधू-भगिनींसाठी तीन टक्के निधी प्रभावीपणे वापरण्याबरोबरच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योग-व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. क्षितिज ग्रुपच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम नक्कीच कोतुकास्पद असून क्षितिज ग्रुपच्या सामाजिक कार्यासाठी आपण करमाळा नगर परिषदेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नगराध्यक्ष सौ. मोहिनी सावंत यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सुनीता दोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षितिज ग्रुपच्या सौ. माधुरी साखरे, डॉ. सुनीता दोशी, सौ. स्वाती रामकृष्ण माने, सुप्रिया येवले, सौ. निलीमा पुंडे, मंजूताई देवी ,पुष्पाताई फंड, सौ कावेरी देशमुख सौ.नलिनी जाधव यांच्यासह सर्व भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. निलिमा पुंडे यांनी पसायदान सादर केले. आभार प्रदर्शन सौ. नलिनी जाधव यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!