करमाळा तालुक्यातील कृषी विभाग राज्यस्तरीय पुरस्कारार्थी डोके व पाटील यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सन्मान…
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडीत पुरस्कार सन 2018 प्राप्त केल्याबद्दल श्री किरण नवनाथ डोके व कृषिभूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार सन – 2019 प्राप्त केल्याबद्दल श्री दादासाहेब नामदेव पाटील यांचा सन्मान करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते दि. 06/05/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कंदर येथे संपन्न झाला. शाल ,श्रीफळ, फेटा, शुभेच्छा पत्र व ट्रॉफी देऊन आमदार शिंदे यांनी दोन्ही पुरस्कारार्थी यांना सन्मानित केले.
यावेळी बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, किरण डोके यांनी 2017 – 18 पासून सनस्टार ए -1 फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून 60 शेतकरी एकत्र करून जवळपास 600 ते 700 एकर क्षेत्रावर निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेऊन एक चांगली बाजारपेठ उपलब्ध केली. केळीपासून वेफर्स बनवण्यासही सुरुवात केली ही गौरवास्पद कामगिरी आहे .तसेच श्री दादासाहेब पाटील यांनी 3 एकर केळी हे पीक सेंद्रिय पद्धतीने घेतले. सेंद्रिय शेती साठी जिवामृत तयार करणेसाठी गावरान गाई व गीर गाईंचे पालनही केले .सेंद्रिय केळी लागवड करून रिलायन्स कंपनी बरोबर करार करून वेगळा पायंडा पाडला. तसेच पांडुरंग शेतकरी बचत गट व पांडुरंग शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले.
राज्य शासनाने गौरविलेल्या या दोन्ही पुरस्कारार्थी यांच्या भावी वाटचालीला याप्रसंगी आमदार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी सरपंच प्रतिनिधी भास्कर अण्णा भांगे ,आदिनाथ कारखाना व्हाईस चेअरमन नानासाहेब लोकरे , एड. जालिंदर बसळे, ग्रामपंचायत सदस्य इरफान जहागिरदार, पत्रकार दादा जगताप , बाळासाहेब घाडगे ,अमर भांगे, आदिनाथ कारखान्याचे संचालक भागवत दादा पाटील ,राजू जहागिरदार, उदोजक लक्ष्मण साळुंके, कृषी अधिकारी संजय वाकडे तसेच कृषी सहाय्यक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
