भीमा-सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा – आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी भीमा-सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन आमदार नारायण आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना बसणाऱ्या संभाव्य आर्थिक फटका व पिकांची सद्यस्थिती याचा प्रशासनानेही गंभीर विचार करावा असे सुचित केले आहे. याबाबत अधिक बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की भीमा-सीना बोगदा तसेच सीना नदीच्या दोन्ही तीरावरील शेती पंपाच्या वीज पुरवठ्यात प्रशासनाने कपात केली असुन याचा थेट परिणाम शेतातील उभ्या पिकांवर होत आहे. उजनीतून सीनेचे सोडलेले आवर्तन पुर्ण होईपर्यंत या परिसरातील शेती पंपाच्या वीज पुरवठ्यात खंड पाडला आहे. वास्तविक पाहता यामुळे कंदर,सातोली,केम तसेच दहिवली, उपळवटे,ढवळस, बारलोणी, महादेववाडी, गवळेवाडी, पिंपरी, कव्हे आदि गावाच्या शिवारातील तसेच बोगदा व नदी काठच्या उभ्या पिकांवरगंभीर परिणाम होऊ लागला आहे. केळी सारखी नगदी पिके वेळीच पाणी नाही मिळाले तर वाया जातील. यामुळे पिक उत्पादनावर दुष्परिणाम होऊन करोडो रुपयांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता तातडीने या पिकांना जीवदान देण्यासाठी या भागातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करावा व शेतकऱ्यांना मुबलक वीज देण्यात यावी. समोर पाणी असुनही हाताशी आलेली पिके वाया जातील याचा विचार प्रशासनाने वेळीच करावा. सध्या शेतकऱ्यांमध्ये वीज कपातीच्या आदेशामुळे तीव्रसंताप असुन प्रशासनानेही वेळीच याची दखल घ्यावी असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी म्हटले आहे.
